Marathi Badbad Geete | मराठी बडबड गीते भाग 2

Photo of author

मराठी बडबड गीते लीरिक्स मराठीमधे भाग 2 | Marathi Badbad Geete Lyrics in English and Marathi Part 2

मराठी बडबड गीते भाग १ नंतर तुमच्यासाठी आठवणीतली ही बडबड गीते भाग 2 (Marathi Badbad Geete Bhag 2) आणत आहे. प्रत्येक मराठी घरात सर्व बालकांसाठी म्हटली किंवा गुणगुणली जाणारी ही गाणी आणि अशाच मराठी बडबड गीतांचा संग्रह खास तुमच्यासाठी .

हा बडबड गीतांचा भाग 2 संग्रह (Marathi Badbad Geete Bhag 2) जर आवडला तर आपल्या मित्र परिवरा ला जरूर फॉरवर्ड करा.

मराठी बडबड गीते भाग 1 साठी- इथे क्लिक करा

अडगुलं मडगुलं
Badbad Geete

बघितली गंमत

भोवऱ्याला असतो एकच पाय !
दुसऱ्या पायाचे कामच काय ?

फोनला असतो एकच कान
ऐकून ऐकून होतो हैराण !

तीन हात फिरवत भोवती
पंखा म्हणतो, ‘उकडतंय किती !’

गिरणीचे तोंड केवढे मोठ्ठे
पोते पोते गहू खाते !

मोराच्या पिसाऱ्याला शंभर डोळे
कुणी निळे, कुणी जांभळे !

बाहुलीची शाळा

बाहुलीचं नाव आई
घालूया का शाळेत ?
मीच घेऊन जाईन तिला
शाळेच्या वेळेत.
आई तिला गणवेश
देशील ना शिवून ?
छोटंसं दप्तर
देशील ना घेऊन ?
डबा-बिबा नको आई
सांगू का तुला ?
माझ्यातली पोळी-भाजी
देईन मी तिला

बाळाचे जेवण

पापड खाल्ला कर्रम् कर्रम्
लोणचं खाल्लं चटक्-मटक्

भात खाल्ला गुटू गुटू
कढी प्यायली भुरुक् भुरुक्

चटणी खाल्ली एक बोट
भरलं बाळाचं पोट पोट

ढेकर आली ढुरुक् ढुरुक्
बाळ हसलं खुदुक् खुदुक्

हे ही बघा: – एक छोटा बीज

बाळाचे दोस्त

एक चिऊ आली
बाळाला पाहून गेली

एक पोपट आला
पेरू देऊन गेला

एक घार आली
बोरं देऊन गेली

एक पारवा आला
जांभळे देऊन गेलं

एक साळुंखी आली
आवळे देऊन गेली

मग आला कावळा
सगळं घेऊन गेला

बुड बुड घागरी

बुड बुड घागरी बुड गं
नदीला आला पूर गं
उड उड पाखरा उड रे
आकाशाला भिड रे
झर झर झोक्या वर जा
हळूच वाकून पहा जरा
खाली उभे कोण रे
इन मीन तीन रे !

भटो भटो | Bhato Bhato in Badbad Geete

भटो भटो, कुठे गेला होतात?
कोकणात.
कोकणातून काय आणले?
फणस.
फणसात काय?
गरे.
गऱ्यात काय?
अठिळा.
तुम्ही खा गरे
आम्ही खातो गरे
म्हशीला काय?
चारखंड.

भावले, भावले

भावले, भावले डोल गं
चुटू चुटू बोल गं
दुध पी कप भर
मग घेईन कडेवर
रडू नको थांब थांब
राहिलंय माझं काम काम
काम करून घेईन तुला
नेईन दूर देईन फुगा
येईल गंमत खूsप खूsप
आता झोप गुsपचूsप

भोवाऱ्याची फजिती

गरगर फिरून
दमला भोवरा
मनात म्हणाला
थांबू का जरा ?
पण एका पायावर
उभं कसं राहायचं ?
सारखं डोकंच
खाली जायचं !

माऊची पिल्लं | Mauchi Pilla in Badbad Geete

मनीच्या कुशीत
झोपलंय कोण?
इटुकली पिटुकली
पिल्लं दोन
मिच् मिच् डोळे
टिल्ले कान
माऊची पिल्लं
गोरीपान

माझ्या या दारातून

माझ्या या दारातून
कोण कोण येतेs कोण कोण येतेs
मामा येतो नि मामी येते
गोड गोड खाऊ देऊन जाते
काका येतो नि काकी येते
छान छान बाहुली देऊन जाते

माझ्या या घरातून
कोण कोण येतेs कोण कोण येतेs
दादा येतो नि वहिनी येते
चणे फुटाणे देऊन जाते
बाबा येतात नि आई येते
गोड गोड पापी घेऊन जाते

मिठ्ठू

इट्टू पिट्टू
मिया मिठ्ठूs
चोच रंगीत
लाल लाल
पांघरतात
हिरवी शाल
खातात काय ?
डाळिंब दाणे
बोलतात कसं ?
मंजुळाने

मोरा मोरा

मोरा, मोरा
काय तुझा तोरा !
रंगीत पिसारा
डोक्यावर तुरा
बघ, वर बघ
आले आले ढग
एक पाय दुमडून
पिसारा उघडून
नाच तर खरा
मोरा, मोरा !

या या आनंदाने खेळूया

या या आनंदाने खेळूया
ठुमकत ठुमकत चालू या ॥धृ॥

हाताचे हे पंख पसरुनी
भुर्रकन उडूनी जाऊ या ॥१॥

हाताचा करू मोर पिसारा
थुई-थुई-थुई-थुई नाचू या ॥२॥

हाताचे करू कान सशाचे
टूण्-टूण्-टूण्-टूण् जाऊया ॥३॥

ये रे ये रे पावसा | Ye Re Ye Re Pawasa in Badbad Geete

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाउस आला मोठा

ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धाऊन
मडके गेले वाहून

पाऊस पडला झिम झिम
अंगण झालं ओलं चिंब
पाऊस पडतो मुसळधार
रान होईल हिरवेगार

Ye Re Ye Re Pawasa in English

ye re ye re pawasa
tula deto paisa
paisa jhala khoTa
paus ala moTha

ye ga ye ga sari
majhe madake bhari
sar ali dhaun
madake gele wahun

paus paDala jhim jhim
AngaN jhala ola chimb
paus paDato musaLadhar
ran hoil hirave gaar

लव लव साळूबाई

लव लव साळूबाई, मामा येतो
झुक झुक गाडीतून, नेईन म्हणतो.

अटक मटक, मामी येते
छानसा बॅट बॉल, देईन म्हणते.

अबरु गबरु, येतो बंट्या
देईन म्हणतो, सगळ्या गोट्या.

नको नको मी, इथेच बरा
आईच्या कुशीतच, आनंद खरा.

लाडोबा | Ladoba

खबडक् खबडक्
घोडोबा.
घोड्यावर बसले
लाडोबा.
लाडोबाचे लाड
करतंय कोण ?
आजोबा, आजी
मावश्या दोन !

सर सर उंच

सर सर उंच
वाढलं झाड
बघता बघता
ढगाआड

ढगांच झालं
पाणीच पाणी
झाडाला सुचली
गोड गोड गाणी

गाण्यांची झाली
फळ, फुलं
वेचायला आली
मुली, मुलं

ससेभाऊ ससेभाऊ

ससेभाऊ ससेभाऊ
चार उड्या मारा पाहू
कश्या कश्या कश्या ?
अश्या अश्या अश्या !

अहो अहो हत्ती
डुलडुलता किती !
कसे कसे कसे ?
असे असे असे !

अहो अहो गाढवदादा
जरा तुमचा सूर काढा
कसा कसा कसा ?
असा असा असा
हाॅंs हाॅंs हाॅंs

सुपलीबाई, सुपलीबाई

सुपलीबाई, सुपलीबाई, काय करता ?
गहू मी पाखडते भराभरा

जातेराव, जातेराव, काय करता ?
गहु मी दळतो भराभरा

चाळणीबाई, चाळणीबाई, काय करता ?
पीठ मी चाळते भराभरा

लाटणेराव, लाटणेराव काय करता ?
पोळ्या मी लाटतो भराभरा

आई बाई, आई बाई, काय करता ?
बाळाला मी वाढते झटाझटा

बाळासाहेब, बाळासाहेब, काय करता ?
पोटभर मी जेवतो पटापटा

हम्मा हम्मा ये गं

हम्मा हम्मा ये गं
बाळाला दूध दे गं
चारा पाटीभर
हम्माला
दुध वाटीभर
बाळाला

हम्माच्या गळ्यात
घुंगुरमाळा
बाळाच्या पायात
चांदीचा वाळा

वाळा वाजतो
छुम छुम
बाळ धावतो
धूम धूम

हरले हप्

हरले हप् ! बसले गप
कर गं आजी
भेंड्याची भाजी
नको गं रडू
कारले कडू
फुगले नाक
पाठीला बाक
पिकले केस
तोंडाला फेस
हळू बाई हळू
शिजले अळू
हरले हप् ! बसले गप

होऊ या – होऊ या

टुणु-टुणु टुणु-टुणु बेडूकताई
डरांव डरांव बोलत राही
आपण उड्या मारू या। बेडूकताई होऊ या ॥१॥

लुसु-लुसु लुसु-लुसु सस्सेभाऊ
कोवळा पाला हाती घेऊ
हिरव्या कुरणी धावू या . सस्सेभाऊ होऊ या ॥२॥

हळु-हळु हळु-हळु हत्ती डोले
लांब सोंड ती मजेत हाले
डोलत डोलत चालू या। हत्ती दादा होऊ या ॥३॥

टप्-टप् टप्-टप् आवाज येई
घोडेदादा धावत जाई
त्याच्यामागे धावू या । घोडे दादा होऊया ॥४॥

सुरु-सुरु सुरु-सुरु मासळी होऊ
पाण्यामध्ये लपून राहू
तिच्यासंगे पोहू या। मासळी ताई होऊ या ॥५॥

Badbad Geete
Badbad Geete


यह भी पढ़ें: –

More Songs from Pushpa: The Rise

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.