तुळसीची आरती | Tulasichi Arati
जय देवी जय देवी जय मये तुळसी ।
अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥
तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ।
अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥
तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी ।
त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय मये तुळसी ।
अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥
मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा ।
पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥
आले यमकिंकर म्हणती रविकुमरा ।
तुळसीमूळें न दिसे पापासी थारा ॥ जय. ॥ २ ॥
तुझिया एका दळे सोडविले देव ।
म्हणुनि तुझ्या चरणीं धरिला दृढ भाव ॥
वृन्दे वस्तीसी तूं मज देई ठाव ।
मुक्तेश्वर म्हणे पै मुख्य सद्भाव ॥ जय. ॥ ३ ॥
जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥
जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥
ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥
शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥
हेही वाचा
Sampurna Gurucharitra | संपूर्ण गुरुचरित्र (52 अध्याय)