गुरूचरित्र – अध्याय एक्केचाळिसावा | Gurucharitra Adhyay 41
Gurucharitra Adhyay 41
॥ श्रीगणेशाय नमः ॥
नामधारक शिष्य देखा । उभा राहोनि संमुखा ।
कर जोडुनी कौतुका । नमन करी साष्टांगीं ॥१ ॥
जय जयाजी सिद्धमुनि । तूं तारक भवार्णी ।
नाना धर्म विस्तारोनि । गुरुचरित्र निरोपिलें ॥२॥
तेणें धन्य झालों आपण । प्रकाश केलें महाज्ञान ।
सुधारस गुरुस्मरण । प्राशविला दातारा ॥३॥
एक असे माझी विनंती । निरोपावें मजप्रती ।
आमुच्या पूर्वजें कवणें रीतीं । सेवा केली श्रीगुरुची ॥४॥
तुम्ही सिद्ध महाज्ञानी । होतां श्रीगुरुसन्निधानीं ।
शिष्य झाले कवणे गुणीं । निरोपावें दातारा ॥५॥
ऐकोनि शिष्याचें वचन । सिद्ध सांगे विस्तारोन ।
एकचित्तें करोनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥६॥
पूर्वीं कथानक सांगितलें । जे कां श्रीगुरुशीं भेटले ।
वोसरग्रामीं एक होते भले । पूर्वज तुमचे परियेसा ॥७॥
तयाचें नाम सायंदेव । केली पूजा भक्तिभाव ।
त्यावरी प्रीति अतिस्नेह । आमुचे श्रीगुरुमूर्तीचा ॥८॥
तेथून आले दक्षिणदिशीं । गाणगापुरीं परियेसीं ।
ख्याति झाली दश दिशीं । कीर्ति वाढली बहुवस ॥९॥
ऐकोनि येती सकळ जन । करिती श्रीगुरुदर्शन ।
जें मनीं करिती चिंतन । पूर्ण होय तयांचें ॥१०॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । होते गाणगापुरा वस्ती ।
नाम श्रीनृसिंहसरस्वती । भक्तवत्सल निर्धारीं ॥११॥
तुमचा पूर्वज जो का होता । सायंदेव भक्त विख्याता ।
त्याणें ऐकिलें वृत्तान्ता । महिमा श्रीगुरु यतीचा ॥१२॥
भक्तिपूर्वक वेगेंसी । आला गाणगापुरासी ।
आनंद बहु मानसीं । हर्षे निर्भर होउनी ॥१३॥
दुरुनि देखिलें गाणगाभुवन । आपण घाली लोटांगण ।
करी दंडप्राय नमन । ऐशापरी चालिला ॥१४॥
ऐसा दंडप्रणाम करीत । गेला विप्र मठांत ।
देखिले तेथें मूर्तिमंत । परात्पर श्रीगुरु ॥१५॥
साष्टांग नमस्कार करीत । असे चरणावरी लोळत ।
केशेंकरुन पाय झाडीत । भक्तिभावें करोनिया ॥१६॥
करसंपुट जोडोनि । स्तुति करी एकाग्र मनीं ।
त्रैमूर्ति तूंचि ज्ञानीं । गुरुमूर्ति स्वामिया ॥१७॥
धन्य धन्य जन्म आपुलें । कृतार्थ पितर माझे झाले ।
कोटि जन्मांचें पाप गेलें । म्हणोनि चरणीं लागला ॥१८॥
जय जयाजी श्रीगुरुमूर्ति । त्राहि त्राहि विश्वपती ।
परमात्मा परंज्योती । नृसिंहसरस्वती स्वामिया ॥१९॥
तुझे चरण वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी ।
परमात्मा तूंचि होसी । भक्तवत्सला स्वामिया ॥२०॥
तुमचे चरणाचिये प्रौढी । वसती तेथें तीर्थें कोडी ।
वर्णिती श्रुति घडोघडी । चरणं पवित्रं विततं पुराणं ॥२१॥
त्रैमुर्तींचा अवतार । मज दिससी साक्षात्कार ।
भासतसे निरंतर । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥२२॥
परब्रह्म तुम्ही केवळू । हातीं दंड कमंडलू ।
अमृत भरलें सोज्ज्वळू । प्रोक्षितां प्रेत उठतसे ॥२३॥
दंड धरिला या कारणें । शरणांगतातें रक्षणें ।
दुरितदैन्य निवारणें । निज भक्त रक्षावया ॥२४॥
रुद्राक्षमाळा भस्मधारण । व्याघ्रचर्माचें आसन ।
अमृतदृष्टि इंदुनयन । क्रूरदृष्टीं अग्निसूर्य ॥२५॥
चतुर्विध पुरुषार्थासी । भक्तजना तूंचि होसी ।
तूंचि रुद्र सत्य होसी । तूं नृसिंह जगद्गुरु ॥२६॥
विष्णुरुपें करिसी रक्षण । पीतांबर पांघरुण ।
तीर्थ समस्त तुझे चरण । भक्ताभिमानी विष्णु तूंचि ॥२७॥
वांझे कन्या पुत्र देसी । शुष्क काष्ठ आणिलें पल्लवासी ।
दुभविली वांझ महिषीसी । अन्न पुरविलें ब्राह्मणा ॥२८॥
विष्णुमूर्ति तूंचि जाण । त्रिविक्रमभारती ऐसी खूण ।
साक्ष दिधली अंतःकरण । विश्वरुप दाखविलें ॥२९॥
म्हणविले वेद पतिताकरवीं । अपार महिमा झाला पूर्वीं ।
नरहरिअवतार मूर्ति बरवी । आलेति भक्त तारावया ॥३०॥
ऐसी नानापरी स्तुति करीत । पुनः पुनः नमन करीत ।
सद्गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठले ॥३१॥
आनंदाश्रुलोचनीं । निघती संतोषें बहु मनीं ।
नव विधा भक्ति करोनि । स्तुति केली श्रीगुरुची ॥३२॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आश्वासिती ।
माथां हस्त ठेवोनि म्हणती । परम भक्त तूंचि आम्हां ॥३३॥
तुवा जें कां स्तोत्र केलें । तेणें माझें मन धालें ।
तुज वरदान दिधलें । वंशोवंशीं माझा दास ॥३४॥
ऐसा वर देउनी । गुरुमूर्ति संतोषोनि ।
मस्तकीं हस्त ठेवोनि । म्हणती जाय संगमासी ॥३५॥
स्नान करुन संगमासी । पूजा करीं अश्वत्थासी ।
त्वरित यावें मठासी । पंक्तीस भोजन करीं गा ॥३६॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती ।
गुरुनिरोप जेणें रीतीं । आला स्नान करोनिया ॥३७॥
षोडशोपचारें श्रीगुरुसी । पूजा करी भक्तींसी ।
अनेक परी पक्वान्नेंसी । भिक्षा करवी परियेसा ॥३८॥
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आपुले पंक्ति ।
समस्त शिष्यांहुनी प्रीती । ठाव देती आपलेजवळी ॥३९॥
भोजन झालें श्रीगुरुसी । शिष्यांसहित विप्रांसी ।
संतोषोनि आनंदेंसी । बैसले होते मठांत ॥४०॥
तया सायंदेवविप्रासी । श्रीगुरु पुसती प्रीतींसी ।
तुझें स्थान कोणे देशीं । कलत्र पुत्र कोठें असती ॥४१॥
पुसती क्षेमसमाधान । कैसें तुमचें वर्तन ।
कृपा असे परिपूर्ण । म्हणोनि पुसती संतोषें ॥४२॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगे सायंदेव विस्तारोन ।
कन्या पुत्र बंधुजन । समस्त क्षेम असती स्वामिया ॥४३॥
उत्तरकांची म्हणोनि ग्रामीं । तेथें वसोनि आम्ही ।
तुझ्या कृपें समस्त क्षेमी । असों देवा कृपासिंधु ॥४४॥
पुत्रवर्ग बंधु जाणा । करिती संसारयातना ।
आपुले मनींची वासना । करीन सेवा श्रीगुरुची ॥४५॥
करुनि सेवा श्रीगुरुची । असेन स्वामी परियेसीं ।
ऐसा माझे मानसीं । निर्धार असे देवराया ॥४६॥
ऐकोन तयाचें वचन । श्रीगुरु म्हणती हासोन ।
आमुची सेवा असे कठिण । आम्हां वास बहुतां ठायीं ॥४७॥
एके समयीं अरण्यांत । अथवा राहूं गांवांत ।
आम्हांसवें कष्ट बहुत । तुम्ही केवी साहूं शका ॥४८॥
येणेंपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोपिती ।
ऐकोन विनवी मागुती । म्हणे स्वामी अंगिकारा ॥४९॥
गुरुची सेवा करी नरू । तोचि उतरे पैल पारु ।
तयासी कैसें दुःख अघोरु । सदा सुखी तोचि होय ॥५०॥
चतुर्विध पुरुषार्थ । देऊं शके श्रीगुरुनाथ ।
त्यासी नाहीं यमपंथ । गुरुभक्ति मुख्य कारण ॥५१॥
येणेंपरी श्रीगुरुसी । सायंदेव भक्तींसी ।
विनवीतसे परियेसीं । संतोषी झाले श्रीगुरुमूर्ति ॥५२॥
श्रीगुरु तया विप्रा म्हणती । जैसें असे तुझे चित्तीं ।
दृढ असेल मनीं भक्ति । तरीच करीं अंगीकार ॥५३॥
स्थिर करोनि अंतःकरण । करितां सेवा-गुरुचरण ।
झाले मास तीन जाण । ऐक शिष्या नामकरणी ॥५४॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं । श्रीगुरु निघाले संगमासी ।
सवें घेतलें सायंदेवासी । समस्तांतें वारुनी ॥५५॥
भक्ताचें अंतःकरण । पहावया गेले श्रीगुरु आपण ।
पूर्वज तुमचा भोळा जाण । जात असे संगमासी ॥५६॥
भक्तासहित संगमासी । गेले श्रीगुरु समयीं निशी ।
बैसते झाले अश्वत्थासी । सुखें गोष्टी करिताती ॥५७॥
दिवस गेला अस्तमानीं । श्रीगुरु विचार करिती मनीं ।
दृढ याचे अंतःकरणीं । कैसी करणी पाहूं म्हणती ॥५८॥
उठविती वारा अवचित । तेणें वृक्ष पडों पाहत ।
पर्जन्य झाला बहुत । मुसळधारा वर्षतसे ॥५९॥
सायंदेव होता जवळी । सेवा केली तये वेळीं ।
केला आश्रय वृक्षातळीं । वस्त्रेंकरुनि श्रीगुरुसी ॥६०॥
पर्जन्य वारा समस्त देखा । साहिले आपण भावें ऐका ।
उभा राहोनि संमुखा । सेवा करी एकभावें ॥६१॥
येणेंपरी याम दोन । पर्जन्य आला महा क्षोभोन ।
आणिक वारा उठोन । वाजे शीत अत्यंत ॥६२॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । शीत झालें बहुवसी ।
तुवां जाउनी मठासी । अग्नि आणावा शेकावया ॥६३॥
गुरुनिरोंपें तत्क्षणीं । ऐक्यभाव धरोनि मनीं ।
निघाला विप्र महाज्ञानी । आणावया वैश्वानर ॥६४॥
निघाला शिष्य देखोनि । श्रीगुरु म्हणती हासोनि ।
नको पाहूं आपुले नयनीं । उभयपार्श्वभागातें ॥६५॥
गुरुनिरोपें येणेंपरी । निघता झाला झडकरी ।
न दिसे वाट अंधकारीं । खुणें खुणें जात असे ॥६६॥
अंधकार महाघोर । पाऊस पडे धुरंधर ।
न दिसे वाटेचा प्रकार । जात असें भक्तिपूर्वक ॥६७॥
मनीं ध्याय श्रीगुरुसी । जातसे तैसा मार्गेसी ।
लवतां वीज संधीसी । तेणें तेजें जातसे ॥६८॥
येणेंपरी द्विजवर । पावला त्वरित गाणगापुर ।
वेशीपाशीं जाऊनि सत्वर । हाक मारिली द्वारपाळा ॥६९॥
तयासी सांगे वृत्तान्त । आणोनि दिधला अग्नि त्वरित ।
घालूनिया भांडयांत । घेवोनि गेला परियेसा ॥७०॥
नसे मार्ग अंधकार । विजेचे तेजें जातसे नर ।
मनीं करितसे विचार । श्रीगुरुंनीं मातें निरोपिलें ॥७१॥
दोहींकडे न पाहें निगुती । श्रीगुरु मातें निरोपिती ।
याची कैसी आहे स्थिति । म्हणोनि पाहे तये वेळीं ॥७२॥
आपुले दक्षिणदिशेसी । पाहतां देखे सर्पासी ।
भिऊनि पळतां उत्तरेसी । अद्भुत दिसे महानाग ॥७३॥
पांच फणी दिसती दोनी । सवेंचि येताती धावोनि ।
विप्र भ्याला आपुले मनीं । धावत जातसे भिऊनिया ॥७४॥
वाट सोडुनी जाय रानीं । सवेंचि येताति सर्प दोनी ।
जातां भयभीत होउनी । अति शीघ्र धावतसे ॥७५॥
स्मरतां झाला श्रीगुरुसी । एकभावें धैर्येंसी ।
जातां विप्र परियेसीं । पातला संगमाजवळीक ॥७६॥
दुरुनि देखे श्रीगुरुसी । सहस्त्रदीपज्योतीसरसी ।
दिसती विप्र बहुवसी । वेदध्वनि ऐकतसे ॥७७॥
जवळी जातां द्विजवरु । एकला दिसे श्रीगुरु ।
गेला समस्त अंधकारु । दिसे चंद्र पौर्णिमेचा ॥७८॥
प्रज्वलित केलें अग्नीसी । उजेड झाला बहुवसी ।
झाला विप्र सावधेसी । पाहतसे श्रीगुरुतें ॥७९॥
दोनी सर्प येवोनि । श्रीगुरुतें वंदोनि ।
सवेंचि गेले निघोनि । तंव हा पूर्वींच भ्यालासे ॥८०॥
श्रीगुरु पुसती तयासी । कां गा भयभीत झालासी ।
आम्हीं तूंतें रक्षावयासी । सर्प दोन पाठविले ॥८१॥
न धरीं आतां भय कांहीं । आमुची सेवा कठीण पाहीं ।
विचार करुनि आपुल्या देहीं । अंगिकारीं मुनिसेवा ॥८२॥
गुरुभक्ति असे कठिण । दृढभक्तीनें सेवा करणें ।
कळिकाळाचें नाहीं भेणें । तया शिष्या परियेसा ॥८३॥
सायंदेव तये वेळीं । लागतसे श्रीगुरुचरणकमळीं ।
विनवीतसे करुणाबहाळी । कृपा करीं म्हणोनिया ॥८४॥
गुरुभक्तीचा प्रकारु । निरोपावा मातें श्रीगुरु ।
जेणें माझें मन स्थिरु । होवोनि राहे तुम्हांजवळी ॥८५॥
श्रीगुरु म्हणती विप्रासी । सांगे कथा सुरसी ।
न गमे वेळ रात्रीसी । ब्राह्म मुहूर्त होय तंव ॥८६॥
पूर्वीं कैलासशिखरासी । बैसला होता व्योमकेशी ।
अर्धांगी पार्वतीसी । कथा एकान्तीं सांगतसे ॥८७॥
गिरिजा पुसे ईश्वरासी । गुरुभक्ति म्हणिजे आहे कैसी ।
विस्तारोनि आम्हांसी । सांगा म्हणे तये वेळीं ॥८८॥
शिव सांगे गिरिजेसी । सर्व साध्य गुरुभक्तीसी ।
करावें एकभावेंसी । शिव जो तोचि गुरु होय ॥८९॥
याचें एक आख्यान । सांगेन तुज विस्तारोन ।
एकचित्तें करोनि मन । ऐक गिरिजे म्हणतसे ॥९०॥
गुरुभक्ति म्हणिजे सुलभपण । तात्काळ साध्य होय जाण ।
अनेक तप अनुष्ठान । करितां विलंब परियेसीं ॥९१॥
नाना तपें अनुष्ठानें । करिती यज्ञ महाज्ञानें ।
त्यांतें होती महाविघ्नें । साध्य होतां दुर्लभ ॥९२॥
जो गुरुभक्ति करी निर्मळ । साध्य होईल तात्काळ ।
यज्ञदान तपफळ । सर्व सिद्धि त्यासी होती ॥९३॥
सुलभ असे अप्रयास । जो जाणे गुरुकुलवास ।
एकभावें धरोनि कांस । आराधावें श्रीगुरुसी ॥९४॥
याचा एक दृष्टान्त । सांगेन ऐका एकचित्त ।
ब्रह्मयाचा अवतार व्यक्त । त्वष्टाब्रह्मा परियेसा ॥९५॥
तयासी झाला एक कुमर । अतिलावण्य सुंदर ।
सर्वधर्मकुशल धीर । योग्य झाला उपनयना ॥९६॥
त्वष्टाब्रह्मा पुत्रासी । व्रतबंध करी परियेसीं ।
करावया विद्याभ्यासासी । गुरुचे घरीं निरविला ॥९७॥
गुरुची सेवा नानापरी । करीतसे ब्रह्मचारी ।
वर्ततां ऐशियापरी । अपूर्व एक वर्तलें ॥९८॥
वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला पर्जन्य बहुवशी ।
पर्णशाळा परियेसीं । गळतसे गुरुची ॥९९॥
तये वेळीं शिष्यासी । निरोपिती गुरु त्यासी ।
त्वरित करावें आम्हांसी । एक गृह दृढ ऐसें ॥१००॥
पर्णशाळा पतिवर्षीं । जीर्ण होतसे परियेसीं ।
गृह करावें दृढतेंसी । कधीं जीर्ण नोहे ऐसें ॥१॥
न तुटे कधीं राहे स्थिर । दिसावें रम्य मनोहर ।
असावें सर्व परिकर । करीं शीघ्र ऐसें गृह ॥२॥
ऐसें गुरु निरोपिती । तेच समयीं गुरुची सती ।
सांगतसे अतिप्रीतीं । मातें कुंचकी आणावी ॥३॥
नसावी विणली अथवा शिवली । विचित्र रंगीत पाहिजे केली ।
माझ्या अंगप्रमाण वहिली । त्वरित आणीं म्हणतसे ॥४॥
गुरुपुत्र म्हणे शिष्यासी । मागेन तें आणीं वेगेंसी ।
पादुका पाहिजेत आम्हांसी । उदकावरुनि चालती ऐशा ॥५॥
अथवा चिखल न लागे त्यांसी । न व्हाव्या अधिक पायांसी ।
जेथें चिंतू मानसीं । तेथें घेऊनि जाती ऐशा ॥६॥
इतुकिया अवसरीं । गुरुकन्या काय करी ।
जातां तयाचा पल्लव धरी । आपणा कांहीं आणावें ॥७॥
उंच तानवडें आपणासी । घेऊनि यावें परियेसीं ।
आणिक आणा खेळावयासी । घरकुल एक आपणा ॥८॥
कुंजराचें दांतें बरवें । घरकुल तुवां आणावें ।
एकस्तंभी असावें । कधीं न तुटे न होय जीर्ण ॥९॥
जेथें नेईन तेथें यावें । सोपस्कारासहित आणावें ।
पाट ठाणवीं असावें । तया घराभीतरीं ॥११०॥
सदा दिसावें नूतन । वावरत असावें आपें आपण ।
करावया पाक निष्पन्न । मडकीं करुनि आणीं पां ॥११॥
आणिक एक सांगेन तुज । रांधप करावया शिकवी मज ।
पाक केलिया उष्ण सहज । असों नयें अन्न आणा ॥१२॥
पाक करिता मडकियेसी । न लागे काजळ परियेसीं ।
आणोनि दे गा भांडीं ऐसीं । आणिक सर्व सोपस्कार ॥१३॥
गुरुकन्या ऐसें म्हणे । अंगिकारिलें शिष्यराणें ।
निघता झाला तत्क्षणें । महा अरण्यांत प्रवेशला ॥१४॥
मनीं चिंता बहु करी । आपण बाळ ब्रह्मचारी ।
काय जाणें त्यांचे परी । केवी करुं म्हणतसे ॥१५॥
पत्रावळी करुं नेणें । इतुकें मातें कधीं होणें ।
स्मरतसे एकाग्र मनें । श्रीगुरुचरण देखा ॥१६॥
म्हणे आतां काय करुं । मातें कोण आधारु ।
बोल ठेवील माझा गुरु । शीघ्र इतुकें न करितां ॥१७॥
कवणापासीं जाऊं शरण । कवण राखील माझा प्राण ।
कृपानिधि गुरुविण । ऐसा कवण असे दुजा ॥१८॥
जरी नायकें गुरुचा बोल । शाप देईल तात्काळ ।
ब्रह्मचारी आपण बाळ । म्हणोनि अंगिकार कां केला ॥१९॥
काय गति आपणासी । आतां जाऊं कवणापासीं ।
अशक्त बाळ मी अज्ञानेसी । अंगिकार कां केला ॥१२०॥
गुरुवाक्य मज कारण । मातें न करी निर्वाण ।
वेंचीन आतां आपुला प्राण । गुरुनिरोप करीन मी ॥२१॥
ऐसें महा अरण्यांत । जातसे बाळ चिंता करीत ।
श्रमोनिया अत्यंत । निर्वाणमनें जातसे ॥२२॥
पुढें जातां मार्ग क्रमित । भेटला एक अवधूत ।
तेणें बाळ देखिला तेथ । पुसता झाला तये वेळीं ॥२३॥
कवण बाळा कोठें जासी । चिंताव्याकुळ मानसीं ।
विस्तारोनि आम्हांसी । सांग म्हणे तये वेळीं ॥२४॥
ऐसें म्हणतां ब्रह्मचारी । जाऊनिया नमस्कारी ।
म्हणे स्वामी तारीं तारीं । चिंतासागरीं बुडतसें ॥२५॥
भेटलासि तूं निधानु । जैसी वत्सालागीं धेनु ।
दुःखी झालों होतों आपणु । देखतां मन निवालें ॥२६॥
जैसे चकोरपक्षियातें । चांदणें देखतां मन हर्षतें ।
तैसें तुझ्या दर्शनमात्रें । आनंद झाला स्वामिया ॥२७॥
माझें पूर्वार्जित पुण्य । कांहीं होतें म्हणोन ।
तुम्ही भेटलेंती निधान । कृपासिंधु परमपुरुषा ॥२८॥
सांगा आपुलें नाम कवण । आगमन झालें कोठून ।
पहा हें निर्मनुष्य अरण्य । येथें तुम्ही भेटलेती ॥२९॥
व्हाल तुम्ही ईश्वरु । मातें कृपा केली गुरु ।
तुम्हां देखता मनोहरु । अंतःकरण स्थिर झालें ॥१३०॥
कीं होसील कृपाळू । सत्त्वप्रिय भक्तवत्सलू ।
मी दास तुझा करीं सांभाळू । म्हणोनि चरणीं लागला ॥३१॥
नमितां तया बाळकासी । उठवीतसे तापसी ।
आलिंगोनि महाहर्षी । आश्वासीतसे तये वेळीं ॥३२॥
मग पुशिला वृत्तान्त । बाळ सांगे समस्त ।
गुरुंनीं जी जी मागितली वस्त । कवणेंपरी साध्य होय ॥३३॥
आपण बाळ ब्रह्मचारी । न होय कार्य तें अंगिकारीं ।
आतां पडिलों चिंतासागरीं । तारीं स्वामी म्हणतसे ॥३४॥
मग अभय देऊनि अवधूत । तया बाळातें म्हणत ।
सांगेन तुज एक हित । जेणें तुझें कार्य साधे ॥३५॥
विश्वेश्वर आराधन । असे एक निधान ।
काशीपूर महास्थान । सकळाभीष्टें साधती ॥३६॥
पंचक्रोश असे क्षिति । तया आगळी विख्याति ।
विष्णुमुख्य ऋषि प्रजापति । तेथें वर लाधले ॥३७॥
ब्रह्मा सृष्टि रचावयासी । वर लाधला त्या स्थळासी ।
वर दिधला विष्णूसी । समस्त सृष्टि पाळावया ॥३८॥
काशीपूर महास्थान । तुवां तेथें जातांचि जाण ।
होईल तुझी कामना पूर्ण । संदेह न धरीं मनांत ॥३९॥
तुवां जावें त्वरितेंसी । जें जें वसे तव मानसीं ।
समस्त विद्या लाधसी । विश्वकर्मा तूंचि जाण ॥१४०॥
चतुर्विध पुरुषार्थ । साध्य होतील त्वरित ।
यापरीस आणिक स्वार्थ । काय असे सांग मज ॥४१॥
तोचि देव असे दयाळ । विचित्र असे त्याचा खेळ ।
उपमन्यु म्हणोनि होता बाळ । तयातें दिधला क्षीरसिंधु ॥४२॥
नामें आनंदकानन । विख्यात असे महास्थान ।
समस्तांची कामना पूर्ण । तये ठायीं होतसे ॥४३॥
नाम असे पुरी काशी । समस्त धर्मांची हे राशी ।
सकळ जीवजंतूंसी । मोक्षस्थान परियेसा ॥४४॥
जे वास करिती तये स्थानीं । त्यांतें देखताचि नयनीं ।
जाती दोष पळोनि । स्थानमहिमा काय सांगूं ॥४५॥
ऐसें काशीस्थान असतां । कां बा करिसी तूं चिंता ।
तेथील महिमा वर्णितां । अशक्य माझे जिव्हेसी ॥४६॥
तया काशीनगरांत । जे जन तीर्थे हिंडत ।
एकेक पाउलीं पुण्य बहुत । अश्वमेधफळ असे ॥४७॥
धर्म अर्थ काम मोक्ष । जी जी मनीं असे कांक्ष ।
जातांचि होईल प्रत्यक्ष । संदेह न धरीं मनांत ॥४८॥
ऐकोनिया ब्रह्मचारी । साष्टांगीं नमस्कारी ।
कोठें असे काशीपुरी । आपण असे अरण्यात ॥४९॥
आनंदकानन म्हणसी । स्वर्गीं असे कीं भूमीसी ।
अथवा जाऊं पाताळासी । कोठें असे सांगा मज ॥१५०॥
या संसारसागरासी । तूंचि तारक जगा होसी ।
ज्ञान मातें उपदेशीं । तारीं मातें स्वामिया ॥५१॥
ऐशिया काशीपुरासी । मातें कोण नेईल हर्षीं ।
विनवूं जरी तुम्हांसी । घेवोनि जावें म्हणोनिया ॥५२॥
कार्य असलिया तुम्हांसी । आम्हां कैसी बुद्धि देशी ।
मी बाळक तुम्हांसी । म्हणोनि चरणीं लागला ॥५३॥
ऐसें म्हणता तापसी । आपण नेईन म्हणे हर्षी ।
तुजकरितां आपणासी । यात्रालाभ घडे थोर ॥५४॥
यापरतें आम्हांसी । काय लाभ विशेषीं ।
वृथा जन्म मानवासी । काशीवास न करितां ॥५५॥
तुजकरितां आपणासी । दर्शन घडे पुरी काशी ।
चला जाऊं त्वरितेंसी । म्हणोनि दोघे निघाले ॥५६॥
मनोवेगें तात्काळीं । पातले विश्वेश्वराजवळीं ।
तापसी म्हणे तये वेळीं । बाळका यात्रा करीं आतां ॥५७॥
बाळ म्हणें तयासी । स्वामी मातें निरोप देसी ।
नेणें यात्रा आहे कैसी । कवणेंपरी रहाटावें ॥५८॥
आपण बाळ ब्रह्मचारी । नेणें तीर्थ कवणेंपरी ।
कवणें विधिपुरःसरीं । विस्तारोनि सांगा मज ॥५९॥
तापसी म्हणे तयासी । सांगेन यात्राविधीसी ।
तुंवा करावें भावेंसी । नेमें भक्तिपूर्वक ॥१६०॥
पहिलें मणिकर्णिकेसी । स्नान करणें नेमेंसी ।
जाऊनिया विनायकासी । पांचाळेश्वरा नमावें ॥६१॥
मग जावें महाद्वारा । विश्वेश्वरदर्शन करा ।
पुनरपि यावें गंगातीरा । मणिकर्णिकास्नान करावें ॥६२॥
मणिकर्णिकेचा ईश्वर । पूजूनिया निर्धार ।
जाऊनिया कंबळेश्वर । पूजा करीं गा भावेंसी ॥६३॥
पुढें ईश्वरवासुकीसी । पूजा करी भक्तींसी ।
पर्वतेश्वर पूजोनि हर्षी । गंगाकेशव पूजीं मग ॥६४॥
ललिता देवी पूजोनि । मग जावें तेथूनि ।
जरासंधेश्वर ध्यानीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥६५॥
सोमनाथ असे थोर पूजावा शूळटंकेश्वर ।
तयापुढें वाराहेश्वर । पूजा करीं गा ब्रह्मेश्वरी ॥६६॥
अगस्त्येश्वर कश्यपासी । पूजा करीं हरिहरेश्वरासी ।
वैजनाथ महाहर्षी । ध्रुवेश्वर पूजीं मग ॥६७॥
गोकर्णेश्वर असे थोर । पूजा करीं गा हाटकेश्वर ।
अस्थिक्षेप तटाकेश्वर । किंकरेश्वर पूजावा ॥६८॥
भारतभूतेश्वरासी । पूजा करीं गा भावेंसी ।
चित्रगुप्तेश्वरासी । चित्रघंट पूजावा ॥६९॥
पाशुपतेश्वर निका । पूजा करोनि तेथें बाळका ।
पितामह असे जो का । ईश्वरातें पूजावें ॥१७०॥
कल्लेश्वरातें वंदूनी । पुढें जावें एक मनीं ।
चंद्रेश्वरातें पूजोनि । पूजा करीं गा विश्वेश्वरा ॥७१॥
पुढें पूजीं विघ्नेश्वर । त्यानंतर अग्नीश्वर ।
मग पूजा नागेश्वर । हरिश्चंद्रेश्वर पूजीं जाण ॥७२॥
चिंतामणि विनायका । सोमनाथ विनायक देखा ।
पूजा करोनि ऐका । वसिष्ठ वामदेव पूजावा ॥७३॥
पुढें त्रिसंध्येश्वर । पूजीं लिंग असे थोर ।
विशालाक्ष मनोहर । धर्मेश्वर पूजावा ॥७४॥
विश्वबाहु पूजा निका । पुढें आशा-विनायका ।
वृद्धादित्य असे जो का । पूजा करीं वो मनोभावें ॥७५॥
चतुर्वक्रेश्वर असे थोर । लिंग असे मनोहर ।
पूजा करीं गा ब्रह्मेश्वर । अनुक्रमें करुनिया ॥७६॥
पुनः प्रकामेश्वर असे खूण । पुढें ईश्वरईशान ।
चंडी चंडेश्वरा जाण । पूजा करीं भक्तींसी ॥७७॥
पूजीं भवानीशंकर । धुंडिराज मनोहर ।
अर्ची राजराजेश्वर । लंगूलेश्वर पूजीं मग ॥७८॥
नकुलेश्वर पूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
परान्नपरद्रव्येश्वरासी । पाणिग्रहणेश्वर पूजीं मग ॥७९॥
गंगेश्वर मोरेश्वर पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान ।
ज्ञानेश्वर अर्चून । नंदिकेश्वर पूजीं मग ॥१८०॥
निष्कलंकेश्वर थोर । लिंग असे मनोहर ।
पूजीं मार्कंडेयेश्वर । असुरेश्वर पूजीं मग ॥८१॥
तारकेश्वर असे थोर । लिंग बहु मनोहर ।
पूजा महाकाळेश्वर । दंडपाणि पूजीं मग ॥८२॥
महेश्वरातें पूजोनि । अर्ची मोक्षेश्वर ध्यानीं ।
वीरभद्रेश्वरसुमनीं । पूजा करीं गा बाळका ॥८३॥
अविमुक्तेश्वरापासीं । तुवां जाऊनियां हर्षी ।
पूजा करीं गा भावेंसी । मोदादि पंच विनायका ॥८४॥
आनंदभैरवपूजा करीं । पुनरपि जाय महाद्वारीं ।
जेथें असे मन्मथारि। विश्वनाथ पूजावा ॥८५॥
बाळा तूंचि येणेंपरी । अंतरगृहयात्रा करीं ।
मुक्तिमंडपाभीतरीं जाऊनिया मंत्र म्हणावा ॥८६॥
श्लोक ॥ अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥८७॥
ऐसा मंत्र जपून । विश्वनाथातें नमून ।
मग निघावें तेथून । दक्षिणमानसयात्रेसी ॥८८॥
मणिकर्णिकेसी जाउनी । स्नान उत्तरवाहिनी ।
विश्वनाथातें पूजोनि । संकल्पावें यात्रेसी ॥८९॥
तेथोनि निघावें हर्षीं । मोदादि पंच विनायकांसी ।
पूजा करीं गा भक्तींसी । धुंडिराज पूजीं मग ॥१९०॥
पूजीं भवानीशंकर । दंडपाणि नमन कर ।
विशालाक्षा अवधार । पूजा तुम्ही भक्तींसी ॥९१॥
स्नान धर्मकूपेसी । श्राद्धविधि करा हर्षीं ।
पूजा धर्मेश्वरासी । गंगाकेशव पूजीं मग ॥९२॥
पूजावी देवी ललिता । जरासंघेश्वर नमितां ।
पूजीं मग सोमनाथा । वराहेश्वरा भक्तींसी ॥९३॥
दशाश्वमेधतीर्थेसी । स्नान करीं श्राद्धेंसी ।
प्रयागतीर्थें परियेसीं । स्नान श्राद्ध करावें ॥९४॥
पूजोनिया प्रयागेश्वरासी । दशाश्वमेध ईश्वरासी ।
पूजा करीं गा भक्तींसी । शीतलेश्वर अर्चीं मग ॥९५॥
अर्ची मग वंदि देवी । सर्वेश्वर मनोभावीं ।
धुंडिराज भक्ति पूर्वीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥९६॥
तिळभांडेश्वर देखा । पूजा करोनि पुढें ऐका ।
रेवाकुंडीं स्नान निका । मानससरोवरीं मग स्नान ॥९७॥
श्राद्धादि पितृतर्पण । मानसेश्वर मग पूजोन ।
मनकामना पावे जाण । ऐक बाळा ब्रह्मचारी ॥९८॥
केदारकुंडीं स्नान । करावें तेथें तर्पण ।
केदारेश्वर पूजोन । गौरीकुंडीं स्नान करा ॥९९॥
पूजीं वृद्धकेदारेश्वर । पूजीं मग हनुमंतेश्वर ।
पूजोनिया रामेश्वर । स्नान श्राध्द कृमिकुंडीं ॥२००॥
सिद्धेश्वरा करीं नमन । करुनि स्वप्नकुंडीं स्नान ।
स्वप्नेश्वर पूजोन । स्नान करीं गा संगमांत ॥१॥
संगमेश्वर पूजोन । लोलार्ककूपीं करीं स्नान ।
श्राद्धकर्म आचरोन । गतिप्रदीप ईश्वरासी ॥२॥
पूजीं अर्कविनायका । पाराशरेश्वरा अधिका ।
पूजा करोनि बाळका । सन्निहत्य कुंडीं स्नान करीं ॥३॥
कुरुक्षेत्र कुंड देखा । स्नान करावें विशेखा ।
सुवर्णादि दानादिका । तेथें तुम्हीं करावें ॥४॥
अमृतकुंडीं स्नान निका । पूजीं दुर्गा विनायका ।
दुर्गादेवीसी बाळका । पूजा करीं मनोभावें ॥५॥
पुढें चौसष्ट योगिनी । पूजा करीं गा मनकामनीं ।
कुक्कुट द्विजातें वंदुनी । मंत्र तेथें जपावा ॥६॥
श्लोक ॥ वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वै द्विजः ।
तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेत् ॥७॥
पुढें मासोपवासासी । पूजिजे गोबाईसी ।
सात कवडया घालूनिया तिसी । नमन भावें करावें ॥८॥
पूजा करीं रेणुकेसी । पुढें स्नान करीं हर्षी ।
शंखोद्धारकुंडेसी । शंखविष्णु पूजिजे ॥९॥
कामाक्षिकुंडीं करीं स्नान । कामाक्षिदेवी पूजोन ।
अयोध्याकुंडीं करीं स्नान । सीताराम पूजावा ॥२१०॥
लवांकुशकुंडीं करीं स्नान । लवांकुशातें पूजोन ।
लक्ष्मीकुंडीं करीं स्नान । लक्ष्मीनारायण पूजावा ॥११॥
सूर्यकुंडीं करीं स्नान । श्राद्धकर्म आचरोन ।
सांबादित्य पूजोन । जावें पुढें बाळका ॥१२॥
वैजनाथकुंड बरवें । तेथें स्नान तुवां करावें ।
वैजनाथातें पूजावें । एकभावेंकरुनिया ॥१३॥
गोदावरीकुंडेसी । स्नान करा भक्तींसी ।
गौतमेश्वर लिंगासी । पूजीं बाळ ब्रह्मचारी ॥१४॥
अगस्तिकुंडीं जावोनि । अगस्तेश्वरा नमूनि ।
स्नान करीं मनापासोनि । पूजा करीं भक्तिभावें ॥१५॥
शुक्रकूपीं करीं स्नान । करी शुक्रेश्वर अर्चन ।
मग पुढें अन्नपूर्णा नमून । पूजा करीं भावेंसी ॥१६॥
धुंडिराजातें पूजोन । ज्ञानवापीं करीं स्नान ।
ज्ञानेश्वर अर्चोन । दंडपाणि पूजावा ॥१७॥
आनंदभैरव वंदोनि । महाद्वारा जाऊनि ।
साष्टांगेसी नमोनि । विश्वनाथा अर्चिजे ॥१८॥
ऐसें दक्षिणमानस । यात्रा असे विशेष ।
ब्रह्मचारी करी हर्ष । योगिराज सांगतसे ॥१९॥
आतां उत्तरमानसासी । सांगेन विधि आहे कैशी ।
संकल्प करोनिया हर्षी । निघावें तुवां बाळका ॥२२०॥
जावें पंचगंगेसी । स्नान करीं महाहर्षी ।
कोटिजन्मपाप नाशी । प्रख्यात असे पुराणीं ॥२१॥
पंचगंगा प्रख्यात नामें । सांगेन असतीं उत्तमें ।
किरणा धूतपापा नामें । तिसरी पुण्यसरस्वती ॥२२॥
गंगा यमुना मिळोनी । पांचही ख्याति जाणोनि ।
नामें असती सगुणी । ऐक बाळा एकचित्तें ॥२३॥
कृतयुगीं त्या नदीसी । धर्मनदी म्हणती हर्षी ।
धूतपापा नाम तिसी । त्रेतायुगीं अवधारा ॥२४॥
बिंदुतीर्थ द्वारापासी । नाम जाण विस्तारेंसी ।
कलियुगाभीतरीं तिसी । नाम झालें पंचगंगा ॥२५॥
प्रयागासी माघमासीं । स्नान करितां फळें जैसीं ।
कोटिगुण पंचगंगेसी । त्याहूनि पुण्य अधिक असे ॥२६॥
ऐशापरी पंचगंगेसी । स्नान करीं गा भावेंसी ।
बिंदुमाधवपूजेसी । पूजा करीं गा केशवा ॥२७॥
गोपालकृष्ण पूजोनि । जावें नृसिंहभुवनीं ।
मंगळागौरी वंदोनि । गभस्तेश्वर पूजावा ॥२८॥
मयूखादित्यपूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
पुनरपि जावें हर्षी । विश्वेश्वरदर्शना ॥२९॥
मागुती मुक्तिमंडपासी । तुवां जावें भक्तींसी ।
संकल्पावें विधींसी । निघावें उत्तरमानसा ॥२३०॥
मग निघा तेथून । आदित्यातें पूजोन ।
अमर्दकेश्वर अर्चोन । पापभक्षेश्वरा पूजिजे ॥३१॥
नवग्रहातें पूजोनि । काळभैरवातें वंदूनि ।
क्षेत्रपाळातें अर्चोनि । काळकूपीं स्नान करीं ॥३२॥
पूजा करोनि काळेश्वरा । हंसतीर्थी स्नान करा ।
श्राद्धपितृकर्म सारा । ऐक बाळा एकचित्तें ॥३२॥
कृत्तिवासेश्वरा देखा । पूजा करोनि बाळका ।
पुढें जाऊनि ऐका । शंखवापीं स्नान करीं ॥३३॥
तेथें आचमन करोनि । रत्नेश्वरातें पूजोनि ।
सीतेश्वरा अर्चोनि । दक्षेश्वर पूजीं मग ॥३४॥
चतुर्वक्रेश्वरीं पूजा । करीं वो बाळा तूं वोजा ।
पुढें स्नान करणें काजा । वृद्धकाळकूपा जावें ॥३५॥
काळेश्वराचे पूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
अपमृत्येश्वरा हर्षी । पूजा करीं गा बाळका ॥३६॥
मंदाकिनी स्नान करणें । मध्यमेश्वरातें पूजणें ।
तेथोनि मग पुढें जाणें । जंबुकेश्वर पूजावया ॥३७॥
वक्रतुंडपूजेसी । तुवां जावें भक्तींसी ।
दंडखात कूपेसी । स्नान श्राद्ध तूं करीं ॥३८॥
पुढें भूतभैरवासी । पूजिजे ईशानेश्वरासी ।
जैगीषव्यगुहेसी । नमन करुनि पुढें जावें ॥३९॥
घंटाकुंडीं स्नान करीं । व्यासेश्वरातें अर्चन करीं ।
कंदुकेश्वरातें अवधारीं । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४०॥
ज्येष्ठवापीं स्नान करणें । ज्येष्ठेश्वरातें पूजणें ।
सवेंचि तुवां पुढें जाणें । स्नान सप्तसागरांत ॥४१॥
तेथोनि वाल्मीकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
भीमलोटा जाऊनि हर्षी । भीमेश्वर पूजावा ॥४२॥
मातृ-पितृकुंडेसी । करणें श्राद्धविधीसी ।
पिशाचमोचन तीर्थेसी । पुढें जावें अवधारा ॥४३॥
पुढें कपर्दिकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
कर्कोटकवापीसी । स्नान करीं गा बाळका ॥४४॥
कर्कोटकेश्वरासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
पुढें ईश्वरगंगेसी । स्नान दान करावें ॥४५॥
अग्नीश्वराचे पूजेसी । चक्रकुंडीं स्नानासी ।
तुंवा जावें भक्तींसी । श्राद्धकर्म करावें ॥४६॥
उत्तरार्क पूजोन । मत्स्योदरीं करीं स्नान ।
ओंकारेश्वर अर्चोन । कपिलेश्वर पूजीं मग ॥४७॥
ऋणमोचन तीर्थेसी । श्राद्धादि करावीं भक्तींसी ।
पापविमोचनतीर्थेसी । स्नानादि श्राद्धें करावीं ॥४८॥
तीर्थ कपालमोचन । स्नान श्राद्ध तर्पण ।
कुलस्तंभाप्रती जाऊन । पूजा करीं गा भक्तींसी ॥४९॥
असे तीर्थ वैतरणी । श्राद्ध करावें तेथें स्नानीं ।
विधिपूर्वक गोदानीं । देतां पुण्य बहुत असे ॥२५०॥
मग जावें कपिलधारा । स्नान श्राद्ध तुम्ही करा ।
सवत्सेसी द्विजवरा । गोदान द्यावें परियेसा ॥५१॥
वृषभध्वजातें पूजोन । मग निघावें तेथून ।
ज्वालानृसिंह वंदोन । वरुणासंगमीं तुम्हीं जावें ॥५२॥
स्नान श्राद्ध करोनि । केशवादित्य पूजोनि ।
आदिकेशव अर्चोनि । पुढें जावें परियेसा ॥५३॥
प्रल्हादतीर्थ असे बरवें । स्नान श्राद्ध तुवां करावें ।
प्रल्हादेश्वरातें पूजावें । एकभावें परियेसा ॥५४॥
कपिलधारा तीर्थ थोर । स्नान करावें मनोहर ।
पूजोनि त्रिलोचनेश्वर । असंख्यातेश्वरा पूजिजे ॥५५॥
पुढें जावें महादेवासी । पूजा करीं गा भक्तींसी ।
द्रुपदेश्वर सादरेंसी । एकभावें अर्चावा ॥५६॥
गंगायमुनासरस्वतींशीं । तिन्ही लिंगें विशेषीं ।
पूजा करीं गा भक्तींसी । काम्यतीर्थ पाहें मग ॥५७॥
कामेश्वरातें पूजोनि । गोप्रतारतीर्थ स्नानीं ।
पंचगंगेसी जाऊनि । स्नान मागुतीं करावें ॥५८॥
मणिकर्णिकास्नान करणें । जलशायीतें पूजणें ।
हनुमंतातें नमन करणें । मोदादि पंच विनायकांसी ॥५९॥
पूजा अन्नपूर्णेसी । धुंडिराज परियेसीं ।
ज्ञानवापीं स्नानेंसी । ज्ञानेश्वर पूजावा ॥२६०॥
पूजीं दंडपाणीसी । मोक्षलक्ष्मीविलासासी ।
पूजा पंचपांडवासी । द्रौपदीदुपदविनायका ॥६१॥
पूजा आनंदभैरवासी । अविमुक्तेश्वर हर्षीं ।
पूजोनिया संभ्रमेंसी । विश्वनाथ संमुख सांगें ॥६२॥
श्लोक ॥ उत्तरमानसयात्रेयं यथावद्या मया कृता ।
न्यूनातिरिक्तया शंभुः प्रीयतामनया विभुः ॥६३॥
ऐसा मंत्र जपोनि । साष्टांगें नमस्कारुनि ।
मग निघावें तेथोनि । पंचक्रोशयात्रेसी ॥६४॥
गंगाकेशव पूजोनि । हरिश्चंद्र मंडपा जावें ॥६५॥
स्वर्गद्वार असे जाण । मणिकर्णिकातीर्थ विस्तीर्ण ।
तुवां तेथें जावोन । संकल्पावें विधीनें ॥६६॥
हविष्यान्न पूर्व दिवशीं । करोनि असावें शुचीसी ।
प्रातःकाळीं गंगेसी । स्नान आपण करावें ॥६७॥
धुंडिराजातें प्रार्थोनि । मागावें करुणावचनीं ।
पुनर्दर्शन दे म्हणोनि । विनवावें परियेसा ॥६८॥
मग गंगेतें नमोनि । जावें विश्वनाथभुवनीं ।
मग तयाते पूजोनि । भवानीशंकर पूजावा ॥६९॥
मग जावें मुक्तिमंडपासीं । नमोनि निघावें संतोषीं ।
धुंडिराजाचे पूजेसी । पुनरपि जावें परियेसा ॥२७०॥
मागुती यावें महाद्वारा । विश्वेश्वर-पूजा करा ।
मोदादि पंच विघ्नेश्वरा । नमन करावें दंडपाणीसी ॥७१॥
पूजा आनंदभैरवासी । मागुतीं यावें मणिकर्णिकेसी ।
पूजोनिया ईश्वरासी । सिद्धिविनायक पूजावा ॥७२॥
गंगाकेशव पूजोनि । ललितादेवीसी नमोनि ।
राजसिद्धेश्वर आणा ध्यानीं । दुर्लभेश्वर पूजावा ॥७३॥
सोमनाथ पूजा करीं । पुढें शूलटंकेश्वरी ।
मग पूजा वाराहेश्वरी । द्शाश्वमेध पूजा मग ॥७४॥
बंदी देवीतें पूजोनि । सर्वेश्वरातें नमोनि ।
केदारेश्वर धरा ध्यानीं । हनुमंतेश्वर पूजावा ॥७५॥
मग पूजावा संगमेश्वरी । लोलार्कातें अवधारीं ।
अर्कविनायका पूजा करीं । दुर्गाकुंडीं स्नान मग ॥७६॥
आर्यादुर्गां देवी पूजोनि । दुर्गा गणेश ध्याऊनि ।
पुनर्दर्शन दे म्हणोनि । प्रार्थावें तयासी ॥७७॥
विश्वकूपेंत ईश्वरासी । कर्दमतीर्थी स्नान हर्षी ।
कर्दमेश्वरपूजेसी । तुवां जावें बाळका ॥७८॥
जावें कर्दमकूपासी । पूजा मग सोमनाथासी ।
मग विरुपालिंगासी । पूजा करीं ब्रह्मचारी ॥७९॥
पुढें जावें नीलकंठासी । पूजा करीं गा भावेंसी ।
कर जोडोनि भक्तींसी । कर्दमेश्वर पूजावा ॥२८०॥
पुनर्दर्शन आम्हांसी । दे म्हणावें भक्तींसी ।
मग निघावें वेगेंसी । नागनाथाचे पूजेतें ॥८१॥
पुढें पूजीं चामुंडेसी । मोक्षेश्वरा परियेसीं ।
वरुणेश्वर भक्तींसी । पूजा करीं गा बाळका ॥८२॥
वीरभद्रपूजेसी । जावोनि द्वितीय दुर्गेसी ।
अर्चावें विकटाक्षा देवीसी । पूजा करीं मनोभावें ॥८३॥
पूजीं भैरव उन्मत्त । विमळार्जुन प्रख्यात ।
काळकूटदेवाप्रत । पूजा करीं गा बाळका ॥८४॥
पूजा करीं महादेवासी । नंदिकेश्वर भैरवासी ।
भृंगेश्वर विशेषीं । पूजा करीं मनोहर ॥८५॥
गणप्रियासी पूजोनि । विरुपाक्षातें नमोनि ।
यक्षेश्वर अर्चोनि । विमलेश्वर पूजीं मग ॥८६॥
भीमचंडीं शक्तीसी । पूजीं चंडीविनायकासी ।
रविरक्ताक्ष गंधर्वासी । पूजा करीं मनोभावें ॥२३॥
ज्ञानेश्वर असे थोर । पूजा पुढें अमृतेश्वर ।
गंधर्वसागर मनोहर । पूजा करीं गा भक्तींसी ॥२४॥
नरकार्णव तरावयासी । पूजीं भीमचंडीसी ।
विनवावें तुम्हीं त्यासी । पुनर्दर्शन दे म्हणावें ॥२५॥
एकपादविनायकासी । पुढें पूजीं भैरवासी ।
संगमेश्वरा भरंवसीं । पूजा करीं गा ब्रह्मचारी ॥२६॥
भूतनाथ सोमनाथ । कालनाथ असे विख्यात ।
पूजा करीं गा त्वरित । कपर्दिकेश्वरलिंगाची ॥२७॥
नागेश्वर कामेश्वर । पुढें पूजीं गणेश्वर ।
पूजा करीं विश्वेश्वर । चतुर्मुख विनायका ॥२८॥
पूजीं देहलीविनायकासी । पूजीं गणेश षोडशीं ।
उदंडगणेश षोडशीं । पूजा करीं मनोहर ॥२९॥
उत्कलेश्वर महाथोर । असे लिंग मनोहर ।
पुढें एकादश रुद्र । तयांचें पूजन करावें ॥३०॥
जावें तपोभूमीसी । पूजा करीं गा भक्तींसी ।
रामेश्वर महाहर्षीं । पूजीं मग सोमनाथ ॥३१॥
भरतेश्वर असे थोर । लक्ष्मणेश्वर मनोहर ।
पूजीं मग शत्रुघ्नेश्वर । भूमिदेवी अर्चीं मग ॥३२॥
नकुळेश्वर पूजोन । करीं रामेश्वरध्यान ।
पुनर्दर्शन दे म्हणोन । विनवावें परियेसा ॥३३॥
असंख्यात तीर्थ वरुण । तेथें करा तुम्हीं नमन ।
असंख्यात लिंगें जाण । पूजा करावी भक्तींसी ॥३४॥
पुढें असे लिंग थोर । नामें देव सिद्धेश्वर ।
पूजा करीं गा मनोहर । पशुपाणि विनायक ॥३५॥
याची पूजा करोनि । पृथ्वीश्वरातें नमोनि ।
शरयूकूपीं स्नान करोनि । कपिलधारा स्नान करीं ॥३६॥
वृषभध्वजा पूजोनि । ज्वालानृसिंहाचे वंदी चरणीं ।
वरुणासंगमीं स्नान करोनि । श्राद्धादि कर्मे करावीं ॥३७॥
संगमेश्वर पूजावा । सर्वविनायक बरवा ।
पुढें पूजीं तूं केशवा । भावें करुनि ब्रह्मचारी ॥३८॥
पूजा प्रर्हादेश्वरासी । स्नान कपिलातीर्थासी ।
त्रिलोचनेश्वरासी । पूजा करीं गा भक्तीनें ॥३९॥
पुढें असे महादेव । पंचगंगातीर ठाव ।
पूजा करीं गा भक्तिभावें । तया बिंदुमाधवासी ॥४०॥
पूजीं मंगळागौरीसी । गभस्तेश्वरा परियेसीं ।
वसिष्ठ वामदेवासी । पर्वतेश्वर पूजावा ॥४१॥
महेश्वराचे पूजेसी । पुढें सिद्धिविनायकासी ।
पूजा सप्तवर्णेश्वरासी । सर्वगणेश पूजावा ॥४२॥
मग जावें मणिकर्णिके । स्नान करावें विवेकें ।
विश्वेश्वरातें स्मरोनि निकें । महादेव पूजावा ॥४३॥
मग जावें मुक्तिमंडपासी । नमन करावे विष्णूसी ।
पूजीं दंडपाणीसी । धुंडिराज अर्चावा ॥४४॥
आनंदभैरव पूजोनि । आदित्येशा नमोनि ।
पूजा करीं गा भक्तींसी । मोदादि पंचविनायका ॥४५॥
पूजा करीं गा विश्वेश्वरासी । मोक्षलक्ष्मीविलासासी ।
नमोनि देवा संमुखेसी । मंत्र म्हणावा येणेंपरी ॥४६॥
श्लोक ॥ जय विश्वेश विश्वात्मन् काशीनाथ जगत्पते ।
त्वत्प्रसादान्महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा ॥४७॥
अनेकजन्मपापानि कृतानि मम शंकर ।
गतानि पंचक्रोशात्मा कृता लिंगप्रदक्षिणा ॥४८॥
ऐसा मंत्र जपोन । पुढें करावें शिवध्यान ।
मुक्तिमंडपा येवोन । आठां ठायीं वंदावें ॥४९॥
प्रथम मुक्तिमंडपासी । नमन करावें परियेसीं ।
वंदोनि स्वर्गमंडपासी । जावें ऐश्वर्यमंडपा ॥५०॥
ज्ञानमंडपा नमोनि । मोक्षलक्ष्मीविलासस्थानीं ।
मुक्तिमंडपा वंदोनि । आनंदमंडपा जावें तुवा ॥५१॥
पुढें वैराग्यमंडपासी । तुवां जावें भक्तींसी ।
येणेंपरी यात्रेसी । करीं गा बाळा ब्रह्मचारी ॥५२॥
आणिक एक प्रकार । सांगेन ऐक विचार ।
नित्ययात्रा मनोहर । ऐक बाळका गुरुदासा ॥५३॥
सचैल शुचि होवोनि । चक्रपुष्करणीं स्नान करोनि ।
देवपितर तर्पोनि । ब्राह्मणपूजा करावी ॥५४॥
मग निघावें तेथोनि । पदादित्येश्वर पूजोनि ।
दंपत्येश्वर नमोनि । श्रीविष्णूतें पूजावें ॥५५॥
मग नमावा दंडपाणि । महेश्वरातें पूजोनि ।
मग निघावें तेथोनि । धुंडिराज अर्चिजे ॥५६॥
ज्ञानवापीं करी स्नान । नंदिकेश्वर अर्चोन ।
तारकेश्वर पूजोन । पुढें जावें मग तुवां ॥५७॥
महाकाळेश्वर देखा । पूजा करीं भावें एका ।
दंडपाणि विनायका । पूजा करीं मनोहर ॥५८॥
मग यात्रा विश्वेश्वर । करीं गा बाळका मनोहर ।
लिंग असे ओंकारेश्वर । प्रतिपदेसी पूजावा ॥५९॥
मत्स्योदरी तीर्थासी । स्नान करावें प्रतिपदेसी ।
त्रिलोचन महादेवासी । दोन्ही लिंगे असतीं जाण ॥६०॥
तेथें बीजतिजेसी । जावें तुवां यात्रेसी ।
यात्रा जाण चतुर्थीसी । कांचीवास लिंग जाणा ॥६१॥
रत्नेश्वर पंचमीसी । चंद्रेश्वरपूजेसी ।
षष्ठीसी जावें परियेसीं । ऐक शिष्या एकचित्तें ॥६२॥
सप्तमीसी केदारेश्वर । अष्टमीसी लिंग धूमेश्वर ।
विश्वेश्वर लिंग थोर । नवमी यात्रा महापुण्य ॥६३॥
कामेश्वर दशमीसी । एकादशीसी विश्वेश्वरासी ।
द्वादशीसी मणिकर्णिकेसी । मणिकेश्वर पूजावा ॥६४॥
त्रयोदशी प्रदोषेसी । पूजा अविमुक्तेश्वरासी ।
चतुर्दशीसी विशेषीं । विश्वेश्वर पूजावा ॥६५॥
जे कोणी काशीवासी । असती नर परियेसीं ।
त्यांणीं करावी यात्रा ऐसी । नाहीं तरी विघ्न घडे ॥६६॥
शुक्लपक्षीं येणेंपरी । यात्रा करीं मनोहरी ।
कृष्णपक्ष आलियावरी । यात्रा करा सांगेन ॥६७॥
चतुर्दशी धरोनि । यात्रा करा प्रतिदिनीं ।
सांगेन ऐका विधानीं । एकचित्तें परियेसा ॥६८॥
वरुणानदीं करा स्नान । करा शैल्येश्वरदर्शन ।
संगमेश्वर पूजोन । संगमीं स्नान तये दिनीं ॥६९॥
स्वर्गतीर्थस्नानेंसी । स्वर्गेश्वर पूजा हर्षी ।
मंदाकिनी येरे दिवसीं । मध्यमेश्वर पूजावा ॥७०॥
मणिकर्णिका स्नानेंसी । पूजा ईशानेश्वरासी ।
हिरण्यगर्भ परियेसीं । दोनी लिंगें पूजिजे ॥७१॥
स्नान धर्मकूपेसी । करीं पूजा गोपद्मेश्वरासी ।
पूजा करा तया दिवसीं । एकचित्तें परियेसा ॥७२॥
कपिलधारा तीर्थासी । स्नान करा भक्तींसी ।
वृषभध्वज लिंगासी । सप्तमीचे दिवसीं पूजीं पै ॥७३॥
उपाशांतिकूपेसी । स्नान करा भक्तींसी ।
उपशांतेश्वरासी । पूजा करीं तया दिनीं ॥७४॥
पंचचूडडोहांत । स्नान करा शिव ध्यात ।
ज्येष्ठेश्वरा त्वरित । पूजावें तया दिनीं ॥७५॥
चतुःसमुद्रकूपासी । स्नान करीं भावेंसी ।
समुद्रेश्वर हर्षी । पूजा करीं तया दिनीं ॥७६॥
देवापुढें कूप असे । स्नान करावें संतोषें ।
शुक्रेश्वर पूजा हर्षें । पूजा करीं तया दिनीं ॥७७॥
दंडखात तीर्थेंसी । स्नान करोनि देवासी ।
व्याघ्रेश्वरपूजेसी । तुंवा जावें तया दिनीं ॥७८॥
शौनकेश्वरतीर्थेसी । स्नान तुम्ही करा हर्षीं ।
तीर्थनामें लिंगासी । पूजा करा मनोहर ॥७९॥
जंबुतीर्थ मनोहर । स्नान करा शुभाचार ।
पूजावा भावें जंबुकेश्वर । चतुर्दश लिंगें येणेंपरी ॥८०॥
शुक्लपक्षकृष्णेसी । अष्टमी तिथि विशेषीं ।
पूजावें तुम्हीं लिंगासी । सांगेन ऐका महापुण्य ॥८१॥
मोक्षेश्वर पर्वतेश्वर । तिसरा पशुपतेश्वर ।
गंगेश्वर नर्मदेश्वर । पूजा करीं मनोभावें ॥८२॥
आणिक भक्तेश्वर गभस्तीश्वर । मध्यमेश्वर असे थोर ।
तारकेश्वरनामें निर्धार । नव लिंगें पूजावीं ॥८३॥
आणिक लिंगें एकादश । नित्ययात्रा विशेष ।
लिंग असे अग्निध्रुवेश । यात्रा तुम्हीं करावी ॥८४॥
दुसरा असे उर्वशीश्वर । नकुलेश्वर मनोहर ।
चौथा असे आषाढेश्वर । भारभूतेश्वर पंचम ॥८५॥
लांगूलेश्वरीं करा पूजा । करा त्रिपुरांतका ओजा ।
मनःप्रकामेश्वरकाजा । तुम्हीं जावें परियेसा ॥८६॥
प्रीतेश्वर असे देखा । मंदालिकेश्वर ऐका ।
तिलपर्णेश्वर निका । पूजा करीं भावेंसी ॥८७॥
आतां शक्तियात्रेसी । सांगेन ऐका विधीसी ।
शुक्लपक्षतृतीयेसी । आठ यात्रा कराव्या ॥८८॥
गोप्रेक्षतीर्थ देखा । स्नान करोनि ऐका ।
पूजा मुख्य भाळनेत्रिका । भक्तिभावेंकरोनिया ॥८९॥
ज्येष्ठवापीं स्नानेंसी । ज्येष्ठागौरी पूजा हर्षीं ।
स्नान पान करा वापीसी । शृंगार सौभाग्य गौरीपूजा ॥९०॥
विशाळगंगास्नानासी । पूजा विशाळगौरीसी ।
ललितातीर्थस्नानेसी । ललिता देवी पूजावी ॥९१॥
स्नान भवानीतीर्थेसी । पूजा करा भवानीसी ।
बिंदुतीर्थ स्नानासी । मंगळागौरी पूजावी ॥९२॥
पूजा इतुके शक्तींसी । मग पूजिजे लक्ष्मीसी ।
येणें विधी भक्तींसी । यात्रा करीं मनोहर ॥९३॥
यात्रातीर्थ चतुर्थीसी । पूजा सर्व गणेशासी ।
मोदक द्यावे गौरीपुत्रासी । विघ्न न करीं तीर्थवासियांतें ॥९४॥
मंगळ अथवा रविवारेंसी । यात्रा करीं भैरवासी ।
षष्ठी तिथि परियेसीं । जावें तुम्हीं मनोहर ॥९५॥
रविवारीं सप्तमीसी । यात्रा रविदेवासी ।
नवमी अष्टमी चंडीसी । यात्रा तुम्हीं करावी ॥९६॥
अंतर्गृहयात्रेसी । करावी तुम्हीं प्रतिदिवसीं ।
विस्तारकाशीखंडासी । ऐक शिष्या ब्रह्मचारी ॥९७॥
ऐशी काशीविश्वेश्वर । यात्रा करावी तुम्हीं परिकर ।
आपुल्या नामीं सोमेश्वर । लिंगप्रतिष्ठा करावी ॥९८॥
इतुकें ब्रह्मचारियासी । यात्रा सांगितली परियेसीं ।
आचरण करीं येणें विधींसी । तुझी वासना पुरेल ॥९९॥
तुझे चित्तीं असे गुरु । प्रसन्न होईल शंकरु ।
मनीं धरीं गा निर्धारु । गुरुस्मरण करीं निरंतर ॥१००॥
इतकें सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं ।
ब्रह्मचारी म्हणे हर्षीं । हाचि माझा गुरु सत्य ॥१॥
अथवा होईल ईश्वर । मज कृपाळू झाला सत्वर ।
कार्यं लाधेल निर्धार । म्हणोनि मनीं धरियेलें ॥२॥
न आराधितां आपोआप । भेटला मातें मायबाप ।
गुरुभक्तीनें अमूप । सकाळाभीष्टें पाविजे ॥३॥
समस्त देवा ऐशी गति । दिल्यावांचोन न देती ।
ईश्वर भोळा चक्रवर्ती । गुरुप्रसादें भेटला ॥४॥
यज्ञ दान तप सायास । कांहीं न करितां सायास ।
भेटला मज विशेष । गुरुकृपेंकरोनिया ॥५॥
ऐसें गुरुस्मरण करीत । ब्रह्मचारी जाय त्वरित ।
विधिपूर्वक आचरत । यात्रा केली भक्तीनें ॥६॥
यात्रा करितां भक्तींसी । प्रसन्न झाला व्योमकेशी ।
निजस्वरुपें संमुखेसी । उभा राहिला शंकर ॥७॥
प्रसन्न होवोनि शंकर । म्हणे दिधला माग वर ।
संतोषोनि त्वष्ट्रकुमार । निवेदिता झाला वृत्तान्त ॥८॥
जें जें मागितलें गुरुवर्यें । आणिक त्याचे कन्याकुमारें ।
सांगता झाला विस्तारें । शंकराजवळी देखा ॥९॥
संतोषोनि ईश्वर । देता झाला अखिल वर ।
म्हणे बाळा माझा कुमार । सकळ विद्याकुशल होसी ॥११०॥
तुवां केली गुरुभक्ति । तेणें झाली आपणा तृप्ति ।
अखिल विद्या तुज होती । विश्वकर्मा तूंचि होसी ॥११॥
चतुर्विध पुरुषार्थ । लाधला तुज परमार्थ ।
सृष्टि रचावया समर्थ । होसी जाण त्वष्ट्रपुत्रा ॥१२॥
ऐसा वर लाधोन । त्वष्टा ब्रह्मानंदन ।
केलें लिंग स्थापन । आपुले नामीं परियेसा ॥१३॥
मग निघाला तेथोनि । केली आयती तत्क्षणीं ।
प्रसन्न होतां शूलपाणि । काय नोहे तयासी ॥१४॥
जें जें मागितलें श्रीगुरुवरें । सकळ वस्तु केल्या चतुरें ।
घेऊनिया सत्वरें । आला श्रीगुरुसंमुख ॥१५॥
सकळ वस्तु देऊनि । लागतसे श्रीगुरुचरणीं ।
अनुक्रमें गुरुरमणि । पुत्र-कन्येंसी वंदिलें ॥१६॥
उल्हास झाला श्रीगुरुसी । आलिंगितसे महाहर्षीं ।
शिष्य ताता ज्ञानराशि । तुष्टलों तुझे भक्तीनें ॥१७॥
सकल विद्याकुशल होसी । अष्टैश्वर्ये नांदसी ।
त्रैमूर्ति तुझिया वंशीं । होतील ऐक शिष्योत्तमा ॥१८॥
घर केलें तुवां आम्हांसी । आणिक वस्तु विचित्रेंसी ।
चिरंजीव तूंचि होसी । आचंद्रार्क तुझें नाम ॥१९॥
स्वर्गमृत्युपाताळासी । पसरवीं तुझे चातुर्यासी ।
रचिसी तूंचि सृष्टीसी । विद्या चौसष्टी तूंचि ज्ञाता ॥१२०॥
तुज वश्य अष्ट सिद्धि । होतील जाण नव निधि ।
चिंता कष्ट न होती कधीं । म्हणोनि वर देतसे ॥२१॥
ऐसा वर लाधोनि । गेला शिष्य महाज्ञानी ।
येणेंपरी विस्तारोनि । सांगे ईश्वर पार्वतीसी ॥२२॥
ईश्वर म्हणे गिरिजेसी । गुरुभक्ति आहे ऐसी ।
एकभाव असे ज्यासी । सकळाभीष्टें पावती ॥२३॥
भव म्हणिजे सागर । उतरावया पैल पार ।
समर्थ असे एक गुरुवर । त्रैमूर्तीचा अवतार ॥२४॥
या कारणें त्रैमूर्ति । गुरुचरणीं भजती ।
वेदशास्त्रें बोलती । गुरुविणें सिद्धि नाहीं ॥२५॥
श्लोक ॥ यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ ।
तस्यैते कथिता ह्यर्था : प्रकाशन्ते महात्मनः ॥२६॥
ऐसें ईश्वर पार्वतीसी । सांगता झाला विस्तारेंसी ।
म्हणोनि श्रीगुरु प्रीतीसी । निरोपिलें द्विजातें ॥२७॥
इतुकें होतां रजनीसी । उदय झाला दिनकरासी ।
चिंता अंधकारासी । गुरुकृपा ज्योती जाणा ॥२८॥
संतोषोनि द्विजवर । करिता झाला नमस्कार ।
ऐसी बुद्धि देणार । तूंचि स्वामी कृपानिधि ॥२९॥
नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे भावेंसी ।
स्वामी कथा निरोपिलीसी । अपूर्व मातें वाटलें ॥१३०॥
काशीयात्राविधान । निरोपिलें मज विस्तारोन ।
तया वेळीं होतों आपण । तुम्हांसहित तेथेंचि ॥३१॥
पाहिलें आपण दृष्टान्तीं । स्वामी काशीपुरीं असती ।
जागृतीं कीं सुषुप्तीं । नकळे मातें स्वामिया ॥३२॥
म्हणोनि विप्र तये वेळीं । वंदी श्रीगुरुचरणकमळीं ।
विनवीतसे करुणा बहाळी । भक्तिभावेंकरोनिया ॥३३॥
जय जया परमपुरुषा । परात्परा परमहंसा ।
भक्तजनमानसहंसा । श्रीनृसिंहसरस्वती ॥३४॥
ऐसें तया अवसरीं । पूर्वज तुझा स्तोत्र करी ।
सांगेन तुज अवधारीं । एकचित्तें करुनिया ॥३५॥
श्लोक ॥ आदौ ब्रह्मत्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं ।
पश्चात् क्षोणिजडा विनाश-दितिजां कृत्वाऽवतारं प्रभो ।
हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं, भूत्वाऽत्मजोऽत्रेर्गृहे ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥३६॥
भूदेवाखिलमानुषं विदुजना बाधायमानं कलिं ।
वेदादुश्यमनेकवर्णमनुजा, भेदादि-भूतोन्नतम् ।
छेदः कर्मतमांधकारहरणं श्रीपादसूर्योदयं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥३७॥
धातस्त्वं हरिशंकरप्रतिगुरो, जाताग्रजन्मं विभो ।
हेतुः सर्वविदोजनाय तरणं, ज्योतिःस्वरुपं जगत् ।
चातुर्थाश्रमस्थापितं क्षितितले, पातुः सदा सेव्ययं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम् ॥३८॥
चरितं चित्रमनेककीर्तिमतुलं, परिभूतभूमंडले ।
मूकं वाक्यदिवांधकस्य नयनं, वंध्यां च पुत्रं ददौ ।
सौभाग्यं विधवां च दायकश्रियं, दत्त्वा च भक्तं जनं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम् ॥३९॥
दुरितं, घोरदरिद्रदावतिमिरं, हरणं जगज्जोतिष ।
स्वर्धेंनुं सुरपादपूजितजना, करुणाब्धिभक्तार्तितः ।
नरसिंहेंद्रसरस्वतीश्वर विभो, शरणागतं रक्षकं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥१४०॥
गुरुमूर्तिश्चरणारविंदयुगलं, स्मरणं कृतं नित्यसौ ।
चरितं क्षेत्रमनेकतीर्थसफलं सरितादि-भागीरथी ।
तुरगामेधसहस्त्रगोविदुजनाः स्मयक् ददंस्तत्फलं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वतीश्रीपादयुग्मांबुजम् ॥४१॥
नो शक्यं तव नाममंगल-स्तुवं, वेदागमागोचरं ।
पादद्वं ह्रदयाब्जमंतरजलं निर्धारमीमांसतं ।
भूयो भूयः स्मरन्नमामि मनसा, श्रीमद्गुरुं पाहि मां ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥४२॥
भक्तानां तरणार्थ सर्वजगतां, दीक्षां ददन्योगिनां ।
सुक्षेत्रं पुरगाणगस्थित प्रभो, दत्त्वा चतुष्कामदं ।
स्तुत्वा भक्तसरस्वतीगुरुपदं, जित्वाऽद्यदोषादिकं ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥४३॥
एवं श्रीगुरुनाथमष्टकमिदं स्तोत्रं पठेन्नित्यसौ ।
तेजोवर्चबलोन्नतं श्रियकरं आनंदवर्धं वपुः ।
पुत्रापत्यमनेकसंपदशुभा दीर्घायुरारोग्यतां ।
वंदेऽहं नरकेसरीसरस्वती श्रीपादयुग्मांबुजम् ॥४४॥
येणेंपरी स्तोत्र करीत । मागुती करी दंडवत ।
सद्गदित कंठ होत । रोमांच अंगीं उठियेले ॥४५॥
म्हणे त्रैमूर्ति अवतारु । तूंचि देवा जगद्गुरु ।
आम्हां दिसतोसी नरु । कृपानिधि स्वामिया ॥४६॥
मज दाविला परमार्थ । लाधलों चारी पुरुषार्थ ।
तूंचि सत्य विश्वनाथ । काशीपुर तुजपाशीं ॥४७॥
ऐसेंपरी श्रीगुरुसी । विनवीतसे परियेसीं ।
संतोषोनि महाहर्षीं । निरोप देती तये वेळीं ॥४८॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । दाखविली तुज काशी ।
पुढें तुझ्या वंशीं एकविसांसी । यात्राफळ तयां असे ॥४९॥
तूंचि आमुचा निजभक्त । दाखविला तुज दृष्टान्त ।
आम्हांपासीं सेवा करीत । राहें भक्ता म्हणती तया ॥१५०॥
जरी राहसी आम्हांपासी । तरी त्वां न वंदिजे म्लेंच्छासी ।
आणोनिया स्त्रीपुत्रांसी । भेटी करीं आम्हांतें ॥५१॥
निरोप देऊनि द्विजासी । गेले गुरु मठासी ।
आनंद झाला मनासी । श्रीगुरुदर्शनीं भक्तजना ॥५२॥
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां ।
विनवीतसे कर जोडोनि जाणा । भक्तिभावेंकरोनिया ॥५३॥
मागें कथानक निरोपिलें । सायंदेव शिष्य श्रीगुरुंनीं त्यातें निरोपिलें ।
कलत्रपुत्र आणीं म्हणत ॥५४॥
पुढें तया काय झालें । विस्तारोनि सांगा वहिलें ।
पाहिजे आतां अनुग्रहिलें । म्हणोनि चरणीं लागला ॥५५॥
संतोषोनि सिद्ध मुनि । सांगतसे विस्तारोनि ।
सायंदेव महाज्ञानी । गेला श्रीगुरुनिरोपें ॥५६॥
जाऊनि आपुले स्त्रियेसी । सांगता झाला पुत्रासी ।
आमुचा गुरु परियेसीं । असे गाणगापुरांत ॥५७॥
आम्हीं जावें भेटीसी । समस्त कन्यापुत्रांसी ।
म्हणोनि निघाला वेगेंसी । महानंदेंकरोनिया ॥५८॥
पावला गाणगापुरासी । भेटी जहाली श्रीगुरुसी ।
नमन करी भक्तींसी । साष्टांगीं तये वेळीं ॥५९॥
कर जोडुनी तये वेळीं । स्तोत्र करी वेळोवेळीं ।
ओंनमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥१६०॥
तूं त्रैमूर्तिचा अवतार । अज्ञानदृष्टीं दिससी नर ।
वर्णावया न दिसे पार । तुझा महिमा स्वामिया ॥६१॥
तुझा महिमा वर्णावयासी । शक्ति कैची आम्हांसी ।
आदिपुरुष भेटलासी । कृपानिधि स्वामिया ॥६२॥
जैसा चंद्र चकोरासी । उदय होतां संतोष त्यासी ।
तैसा आनंद आम्हांसी । तुझे चरण लक्षितां ॥६३॥
पूर्वजन्मीं पापराशि । केल्या होत्या बहुवशी ।
श्रीगुरुचे दर्शनेसी । पुनीत झालों म्हणतसे ॥६४॥
जैसा चिंतामणि स्पर्शीं । हेमत्व होय लोहासी ।
मृत्तिका पडतां जंबूनदीसी । उत्तम सुवर्ण होतसे ॥६५॥
जातां मानससरोवरासी । हंसत्व येई वायसासी ।
तैसें तुझे दर्शनेंसी । पुनीत झालों स्वामिया ॥६६॥
श्लोक ॥ गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तस्था ।
पापं तापं च हरति दैन्यं च गुरुदर्शनम् ॥१॥
टीका ॥ गंगा स्नानानें पापें नाशी । ताप निवारी देखा शशी ।
कल्पवृक्षछायेसी । कल्पिलें फळ पाविजे ॥६७॥
एकेकाचे एकेक गुणें । असतीं ऐसीं हीं लक्षणें ।
दर्शन होतां श्रीगुरुचरणें । तिन्ही फळें पाविजे ॥६८॥
पापें हरती तात्काळीं । तापचिंता जातीं सकळी ।
दैन्यकानन समूळ जाळी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥६९॥
चतुर्विध पुरुषार्थ । देता होय गुरुनाथ ।
ऐसा वोले वेदसिद्धान्त । तोचि आम्हीं देखिला ॥१७०॥
म्हणोनिया आनंदेंसी । गायन करी संतोषीं ।
अनेक रागें परियेसीं । कर्नाटक भाषें करोनि ॥७१॥
राग श्रीराग । कंडेनिंदु भक्तजनराभाग्यनिधियभूमंडलदोळगेनारसिंहसरस्वतीया ॥७२॥
कंडेनिंदुउंडेनिंदुवारिजादोळपादवाराजाकमळांदोळदंतध्यानिसी ॥७३॥
सुखसुवाजनारुगळा । भोरगेलान्नेकामिफळफळा ।
नित्यसकळाहूवा । धीनारसिंहसरस्वतीवरानना ॥७४॥
वाक्यकरुणानेनसुवा । जगदोळगदंडकमंडलुधराशी ।
सगुणानेनीशीसुजनरिगे । वगादुनीवासश्रीगुरुयतिवरान्न ॥७५॥
धारगेगाणगापुरडोलकेलाशीहरी । दासिसोनुनादयाकरुणादली । वरावीतुंगमुनाहोरावनुअनुबिना ।
नारसिंहसरस्वतीगुरुचरणवन्न ॥७६॥
राजगखंडीकंडीनेननमा । इंदुकडेनेनमा ।
मंडलादोळगेयती कुलराये । चंद्रमन्ना ॥७७॥
तत्त्वबोधायाउपनिषदतत्त्वचरित नाव्यक्तवादपरब्रह्ममूर्तियनायना ।
शेषशयनापरवेशकायना । लेशकृपयनीवनेवभवासौपालकाना ॥७८॥
गंधपरिमळादिशोभितानंदासरसाछंदालयोगेंद्रेगोपीवृंदवल्लभना ॥७९॥
करीयनीयानांपापगुरु । नवरसगुसायन्नीं ।
नरसिंहसरस्वत्यन्ना । नादपुरुषवादना ॥१८०॥
यापरी स्तोत्रें श्रीगुरुसी । स्तुति केली बहुवसीं ।
संतोषोनि महाहर्षीं । आश्वासिताती तये वेळीं ॥८१॥
प्रेमभावें समस्तांसी । बैसा म्हणती समीपेसी ।
जैसा लोभ मायेसी । या बाळकावरी परियेसा ॥८२॥
आज्ञा घेउनी सहज । गेला तुमचा पूर्वज ।
सकळ पुत्रांसहित द्विज । आला श्रीगुरुदर्शना ॥८३॥
भाद्रपद चतुर्दशीसी । शुक्लपक्ष परियेसीं ।
आला शिष्य भेटीसी । एकाभावेंकरोनिया ॥८४॥
येती शिष्य लोटांगणीं । एकाभावें तनुमनीं ।
येऊनि लागती चरणीं । सद्गदित कंठ झाला ॥८५॥
स्तोत्र करिती तिहीं काळीं । कर जोडोनि तये वेळीं ।
ओं नमोजी चंद्रमौळि । त्रैमूर्ति तूंचि होसी ॥८६॥
त्रैमूर्तींचा अवतारु । झालासी तूं जगद्गुरु ।
येरां दिसतोसी नरु । न कळे पार तुझा स्वामिया ॥८७॥
सिद्ध म्हणे नामकरणी । काय सांगू तये दिनीं ।
कैशी कृपा अंतःकरणीं । तया श्रीगुरु यतीचे ॥८८॥
आपुले पुत्रकलत्रेंसी । जैसा लोभ परियेसीं ।
तैसा तुमचे पूर्वजासी । प्रेमभावें पुसताती ॥८९॥
गृहवार्ता सुरसी । क्षेम पुत्रकलत्रेंसी ।
द्विज सांगे मनोहर्षी । सविस्तारीं परियेसा ॥१९०॥
पुत्रकलत्रेंसंहित नमोन । सांगे क्षेम समाधान ।
होते पुत्र चौघेजण । चरणावरी घातले ॥९१॥
ज्येष्ठसुत नागनाथ । तयावरी कृपा बहुत ।
कृपानिधि गुरुनाथ । माथां हस्त ठेविती ॥९२॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । तुझ्या ज्येष्ठसुतासी ।
आयुष्य पूर्ण असे त्यासी । संतति बहु याची वाढेल ॥९३॥
हाच भक्त आम्हांसी । असेल श्रियायुक्तेसी ।
तुवां आतां म्लेंच्छासी । सेवा न करावी म्हणितलें ॥९४॥
आणिक तूंतें असे नारी । पुत्र होती तीस चारी ।
नांदतील श्रेयस्करी । तुवां सुखें असावें ॥९५॥
जया दिवसीं म्लेंच्छासी । तुवां जावोनि वंदिसी ।
हानि असे जीवासी । म्हणोनि सांगती तये वेळीं ॥९६॥
तुझा असे वडिल सुत । तोचि आमुचा निज भक्त ।
त्याची कीर्ति वाढेल बहुत । म्हणती श्रीगुरु तये वेळीं ॥९७॥
मग म्हणती द्विजासी । जावें त्वरित संगमासी ।
स्नान करोनि त्वरितेंसी । यावें म्हणती तये वेळीं ॥९८॥
ग्रामलोक तया दिवसीं । पूजा करितां अनंतासी ।
येऊनिया श्रीगुरुसी । पूजा करितो परियेसा ॥९९॥
पुत्रमित्रकलत्रेंसी । गेले स्नाना संगमासी ।
विधिपूर्वक अश्वत्थासी । पूजूनि आले मठातें ॥२००॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । आजि व्रतचतुर्दशी ।
पूजा करीं अनंतासी । समस्त द्विज मिळोनि ॥१॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु ।
आमुचा अनंत तूंचि गुरु । व्रतसेवा तुमचे चरण ॥२॥
तये वेळीं श्रीगुरु । सांगतां झाला विस्तारु ।
कौंडिण्यमहाऋषीश्वरु । केलें व्रत प्रख्यात ॥३॥
ऐसें म्हणतां द्विजवरु । करितां होय नमस्कारु ।
कैसें व्रत आचरावें साचारु । पूर्वीं कोणी केलें असे ॥४॥
ऐसें व्रत प्रख्यात । व्रत दैवत अनंत ।
जेणें होय माझें हित । कथामृत निरोपिजे ॥५॥
येणें पुण्य काय घडे । काय लाभतसे रोकडें ।
ऐसें मनींचें साकडें । फेडावें माझें स्वामिया ॥६॥
ऐसें विनवीतसे द्विजवरु । संतोषोनि गुरु दातारु ।
सांगते झाले व्रताचारु । सिद्ध म्हणे नामधारका ॥७॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधरु । सांगे गुरुचरित्रविस्तारु ।
ऐकतां भवसागरु । पैल पार पाववी श्रीगुरु ॥८॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीयात्रा समस्त करीत ।
श्रोते ऐकती आनंदित । तेणें सफल जन्म होय ॥९॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सांगतसे नामधारक विख्यात ।
जेणें होय मोक्ष प्राप्त । द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥२१०॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीक्षेत्रमहिमावर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥४२॥
॥ ओवीसंख्या ॥२१०॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । गुरुचरित्र ऐकतां संतोषीं ।
येणेंचि तूं पावशी । चारी पुरुषार्थ इह सौख्य ॥६५॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्टे साधिजे ॥६६॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । काशीखंडीं यात्रा निरोपित ।
कथा असती पुराणविख्यात । एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥२६७॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे काशीमहायात्रानिरुपणं नाम एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४१॥
॥ ओवीसंख्या ॥२६७॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
End of Gurucharitra Adhyay 41