शंकराची आरती | Shankarachi Arati
Shankarachi Arati | शंकराची आरती | by Sant Ramdas Swami from Sajjangad, (Satara Dist., Maharashtra). He was a great Bhakta of Lord Rama.
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ० ॥
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभूतीचे उधळण शितिकंठ निळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥ जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ० ॥
देवीं दैत्यीं सागरमंथन पै केले । त्यामाजी अवचित हालाहल जे उठले । ते त्वा असुरपणे प्राशन केले । नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ ३ ॥ जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ० ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी । शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ ४ ॥ जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ० ॥
– समर्थ रामदासस्वामी (Shankarachi Arati)