॥ विठ्ठलाची आरती ॥
Shri Vitthalachi Arati | विठ्ठलाची आरती | by Sant Namdev Maharaj from Paithan. He was a great Bhakta of Lord Panduranga.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ जय देव जय देव ॥ धृ० ॥
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥ देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ २ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ जय देव जय देव ॥ धृ० ॥
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ॥ राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥ ३ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ जय देव जय देव ॥ धृ० ॥
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥ दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ जय देव जय देव ॥ धृ० ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ॥ दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ ५ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ जय देव जय देव ॥ धृ० ॥
रचना:– संत नामदेव (Vitthalachi Arati)